कोपरगावात आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात अतिशय प्रेम आणि आदराची भावना आहे. राष्ट्राचे अस्तित्व निर्माण करून स्वातंत्र्याची नवऊर्जा आणि नवचैतन्य प्रदान करण्याचे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जात असून त्यांच्या राज्याभिषेकामुळे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले. अशा अद्वितीय,अलौकिक छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीत जन्म झाल्याचा प्रत्येकाला अभिमान आणि गर्व असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
जगातील अब्जावधी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुरुवार (दि.६) रोजी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले. महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात येवून महाआरती करण्यात आली व मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता व संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती असलेल्या महाराजांनी शूर कामगिरी करत मध्ययुगीन काळात देशावर परकीय शत्रूंचे वर्चस्व डोके वर काढत असताना लोकांना या गुलामगिरीतून मुक्त केले. त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहिली पहाट उदयास आणून लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावला होता. कुशल प्रशासनकर्ते असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शासनपद्धती चालविली त्यांच्या आदर्श कार्यपद्धतीचा आजही आधार घेतला जातो यावरून महाराज अद्वितीय, उत्कृष्ट राज्यकर्ते असल्याचे अधोरेखित होते. त्यांचे शासन त्यांनी आखलेल्या कायद्यांच्या चौकटीनुसार चालत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावायची कोणाची हिंमत त्यावेळी कुणी करीत नसे. दीनदुबळ्या लोकांनासुद्धा महाराजांच्या राज्यात संरक्षण मिळत असल्यामुळे महाराजांची कीर्ती महान ठरली असून असा राजा पुन्हा होणार नाही असे आ.आशुतोष काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.